Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

संध्याछाया भिवविती हृदया

Read time: एक मिनट
संध्याछाया भिवविती हृदया

आयुष्याची सगळी उमेदीची वर्षे धावपळीत घालवल्यावर म्हातारपण निवांत जावे अशी प्रत्येक सर्वसामान्य माणसाची माफक अपेक्षा असते, नाही का? पण आपल्या देशातल्या वृद्धांची परिस्थिती मात्र थोडी काळजीत टाकणारी असल्याचे एका नवीन संशोधनातून लक्षात आले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या दोन वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनातून पुढे आलेल्या माहितीनुसार, ५% वृद्धांना नानाविध शारीरिक व्याधींमुळे साधं निरोगी जगणंही अशक्यप्राय होऊन बसलं आहे. १९९० नंतरच्या उंचावलेल्या आयुर्मानाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती निराशाजनक वाटणे अगदी साहजिक आहे. हे असे का बरे झाले असावे? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न वैज्ञानिकानी त्यांच्या संशोधनातून केलेला आहे.

या प्रश्नाचं उत्तर दडलंय काही ठराविक व्याधींमुळे येणाऱ्या शारीरिक असमर्थतेमध्ये. बाहेरील देशांमध्ये झालेल्या संशोधनातून असं लक्षात आलंय की मधुमेह, हृदयविकार, संधिवात यासारखे काही दुर्धर विकार रुग्णांना, विशेषतः वृद्ध रुग्णांना अपंग, आणि त्यामुळे परावलंबी बनवण्यास कारणीभूत असतात. मात्र भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावरचे हे पहिलेच संशोधन आहे, ज्यात तब्बल ५३,५८२ लोकांचा समावेश करण्यात आला आहे! या आधीचे प्रयत्न फार लहान पातळीवर झाल्यामुळे म्हणावे इतके सर्वसमावेशक नव्हते. बीएमसी गेरियाट्रिक्स  मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात रक्तदाब, मधुमेह यासारखे दीर्घकालीन आजार ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींच्या दैनंदिन हालचालींवर कसा प्रभाव पाडतात हे समजून घ्यायचा प्रयत्न वैज्ञानिकांनी केला आहे.

“आमच्या माहितीप्रमाणे विविध रोग आणि अपंगत्वामधले दुवे शोधणारा हा भारतातला पहिलाच प्रयोग आहे. यामुळे भारतात वृद्धांमधील अपंगत्व समजून घेण्यास मोलाची मदत होऊ शकते. आपल्या देशाची ७ टक्क्याहून अधिक लोकसंख्या वृद्ध असल्याने, भारत हा जगातल्या ‘वृद्ध होणाऱ्या’ देशांमध्ये गणला जातो. या पार्श्वभूमीवर आपल्या वृद्धांच्या या अडचणी समजून घेणे महत्वाचे असेल” - असे मत या वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे.

यासाठी लागणारी माहिती ‘इंडियन ह्यूमन डेव्हलोपमेंट सर्वे’ नावाच्या सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीतून (आयएचडीएस - २) घेण्यात आली होती. २०११-१२ मध्ये झालेल्या या सर्वेक्षणात १५ प्रकारच्या दीर्घकालीन आजारांमुळे उद्भवणाऱ्या ७ तऱ्हेच्या दैनंदिन हालचालींमधील अपंगत्वाबद्दल एकूण  ५३,५८२ लोकांकडून माहिती गोळा करण्यात आली होती. जर वृद्धांना चालणे, शौचास जाणे, कपडे घालणे यासारखी दैनंदिन कामे स्वतः करण्यात अडचणी येत असतील, तर त्यांना या सर्वेक्षणात अपंग असे संबोधले गेले आहे. तीन दीर्घकालीन आजार - रक्तदाब, मधुमेह, आणि हृदयविकाराचा या अपंगत्वावर कसा आणि किती परिणाम होतो, हे पाहणे असा यामागचा उद्देश होता.

यातून पुढे आलेल्या माहितीनुसार, आपल्या देशातल्या वृद्धांपैकी १७.९३ % पुरुष व २६.२१ % स्त्रियांना अशा आजारांमुळे येणारे सौम्य किंवा गंभीर प्रमाणातले अपंगत्व सहन करावे लागते आहे. म्हणजे या टक्केवारीवरून जर अंदाज बांधला तर सुमारे ९ दशलक्ष पुरुष आणि १४ दशलक्ष स्त्रिया हा त्रास मुकाटपणे सहन करत आहेत! जनगणनेत केलेल्या अंदाजापेक्षा हा आकडा बराच मोठा आहे. मधुमेह इत्यादी दीर्घकालीन आजार असणाऱ्या वृद्धांमध्ये या अपंगत्वाचे प्रमाण १.८ पतीने जास्त असल्याचेही संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. निवडलेल्या तीन आजारांपैकी मधुमेह हाच वृद्धापकालीन अपंगत्वास सर्वाधिक कारणीभूत ठरत असल्याचं दिसून आलंय.

“ह्या वृद्धापकालीन अपंगत्वाचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये, मुख्यतः अविवाहित आणि वयाची  ८० वर्षे  पार केलेल्या स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते,” असे या शास्त्रज्ञांचे मत आहे. तसेच, शिक्षण आणि आर्थिक परिस्थितीमधील तफावत सुद्धा या अपंगत्वाचं प्रमाण ठरवण्यात महत्वाचे ठरत असल्याचं  सूचक निरीक्षण या संशोधनाच्या निमित्ताने पुढे आलं आहे.

आपल्या देशातील अधिकाधिक लोकसंख्या दीर्घकालीन आजार आणि त्यातून उद्भवणारे अपंगत्वाला बळी पडत राहिल्यास देशाच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी चिंता संशोधकानी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसल्यास नवीन परिणामकारक आरोग्य योजना आखून त्या अमलात आणण्याची गरज असल्याचे त्यांना वाटते. वृद्धापकाळातील हे परावलंबित्व टाळण्यासाठी तरुणपणापासूनच शक्य तेवढी निरोगी जीवनशैली पाळणे फायदेशीर ठरेल. हे साध्य करण्यासाठी  सरकारसह सर्वच पातळ्यांमधून  प्रयत्न  व्हायला हवेत असा सल्ला संशोधकानीं दिला आहे.